भींड (मध्य प्रदेश): शाळेत दररोज 24 किमी सायकल चालवत जायचे तरीही तीने हार मानली नाही आणि दहावीच्या परिक्षेत चक्क 98.75 टक्के गुण मिळवले. रोशनी भदोरिया असे या बहाद्दर मुलीचे नाव.
आपल्या मुलीच्या मार्कांनी भारावलेले तिचे वडील पुरषोत्तम भदोरिया म्हणाले, मला माझ्या मुलीच्या यशाचा अभिमान आहे. तिच्या शाळेत जाण्यासाठी आता मी वाहतुकीची सोय करणार आहे. चंबळ खोऱ्यातील भींड जिल्ह्यातील अंजोली गावातील रोशनीने मध्य प्रदेशच्या गुणवत्ता यादीत आठवे स्थान प्राप्त केले आहे.
याआधी रोशनी दुसऱ्या शाळेत शिकत होती. तिथे बसची सोय होती. पण नंतर तिला मेहगाव येथील सरकारी शाळेत घातले. तेथे वाहतूकीची सोय नव्हती. अंजोलीपासून हे अंतर 12 किमी आहे. नववीत शाळेत नाव घातल्यापासून शाळेत जाण्यासाठी तिला सायकलशिवाय दुसरे वाहनच उपलब्ध नव्हते. त्यामुळे आता मी तिला शिकण्यासाठी जाण्याला वाहतुकीची अन्य काहीतरी सोय करणार आहे, असे पुरषोत्तम यांनी सांगितले.
रोशनी म्हणाली, सायकलवरून शाळेत जाणे कठीण होते. मी मोजले नाही पण 70-80 दिवस मी सायकलवरून जात होते. वडिलांना वेळ असेल त्यावेळी ते मोटारसायकलवरून शाळेत सोडत असत. एवढे सायकलींग करून परतल्यानंतर मी सात ते आठ तास अभ्यास करत असे. मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे.