मांडवगण फराटा – शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथे विहीरीत पडून दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. ओंकार बाळासाहेब जांभळकर (वय 18 महिने) असे या चिमकुल्याचे नाव आहे. याबाबत सोमनाथ जांभळकर यांनी फिर्याद दिली.
सोमवारी (दि. 31) सायंकाळच्या सुमारास घरापासून ओंकार हा खेळत असताना अचानक गायब झाला. काही वेळानंतर ओंकार गायब असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी आजुबाजूला शोध घेणे सुरू केले; मात्र ओंकार मिळून आला नाही. घरापासून काही अंतरावर विहीर आहे.
त्याचबरोबर या परिसरात बिबट्याचाही वावर असल्याने शंका उपस्थित होत असल्याने अनेकांनी शोधकार्य सुरू ठेवले. दरम्यान स्थानिकांच्या मदतीने रात्रीच्या सुमारास शेजारील असलेल्या विहिरीत चार विद्युत पंपांच्या सहाय्याने पाणी उपसा केला. मध्यरात्रीच्या सुमारास ओंकारचा मृतदेह मिळून आला.