नेवासा, (प्रतिनिधी) – चिकमंगळूर जिल्ह्यातील तारीकेरे मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जी.एच श्रीनिवासा यांनी गुरुवारी सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे शनि महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी सत्कार केला.
श्रीनिवास यांनी तारीकेरे या मतदारसंघातून सलग दोन वेळा विजय मिळविला असून १९७७ मध्ये रायबरेली मतदारसंघातून माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी चिकमंगळुर या लोकसभा मतदारसंघातून १९७८ साली विजय मिळविलेला होता. अशा ऐतिहासिक जिल्ह्यातील तारीकेरे या विधानसभा क्षेत्रातून श्रीनिवासा यांनी सलग दोन वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर विधानसभेत जाण्याचा बहुमान मिळविलेला आहे.
आ. श्रीनिवासा यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी वणी श्रीनिवासा, कन्या निधी, रचना व जावई चेतन यांनी देखील उदासी महाराज मठात अभिषेक करत शनि देवाच्या मूर्तीवर तेल अर्पण करून शनि देवाचे मनोभावे दर्शन घेतल.
यानंतर जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी त्यांचा शाल व शनि देवाचा प्रसाद देऊन सन्मान केला. संपूर्ण देशात हुकूमशाही सुरू झाली असून, लोकशाही टिकविण्यासाठी यंदा देशात काँग्रेस व मित्रपक्षाच्या इंडिया आघाडीचे सरकार यावे, यासाठी शनि देवाकडे मनोभावे प्रार्थना केल्याचे श्रीनिवासा यांनी सांगितले.