हिंगोली – हिंगोली येथे दरवर्षी श्रावण महीन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी कावडीचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील आमदार संतोष बांगर यांनी आयोजन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.8) रोजी कावड यात्रेला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या वतीने हिंगोली शहरात जड वाहनांना बंदी राहणार आहे.
वाहतुकरिता बंद असलेले मार्ग –
सोमवारी दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यन्त हिंगोली शहरात जड वाहनांना पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार नरसी टी पॉईन्ट, खटकळी बायपास, अकोला बायपास येथून शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच शहरातील अग्निशामक दल कार्यालय ते इंद्ररा गांधी चौक रस्त्यावर वाहतूक पूर्ण पणे बंद राहणार आहे.
वाहतुकीसाठी पर्याय मार्ग –
औंढा नागनाथ, सेनगावकडून हिंगोली शहरात येणाऱ्या व वाशिमच्या दिशेने जाण्यासाठी कयाधू नदी नांदेड नाका, जिल्हा परिषद कॉर्नर, बियाणीनगर कॉर्नर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, रीसालाबाजार, अकोला बायपास मार्गे जाता येणार आहे. वाशिमकडून औंढा नागनाथ, नरसीकडून जाणाऱ्या वाहनांना याच मार्गाने जावे लागेल. तसेच जवळा पळशीकडून येणाऱ्या वाहनांना सिद्धार्थ नगर , आरामशीन रेल्वे स्टेशन रोड, एलआयसी ऑफिस, पोस्ट ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या मार्गे यावे लागेल.
मुख्यमंत्री हा शेतकऱ्यांचा मुलगा आहे ते नक्कीच कावड यात्रेत पैदल चालतील – आमदार संतोष बांगर
मुख्यमंत्री हे कावड यात्रेमध्ये तीन ते चार किलोमीटर पैदल चालणार असल्याची माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे. कळमनुरी येथून निघणाऱ्या कावड यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक दाखल होणार असून, व्यापारी उद्योजक व शेतकऱ्यांनी या कावड यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आमदार संतोष बांगर यांनी आवाहन केले आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावून मुख्यमंत्री प्रथम कळमनुरी तालुक्यातील विविध कार्यक्रम आटोपून ते हिंगोली येथील गांधी चौक येथील जाहीर सभेमध्ये हजेरी लावणार आहेत.