सातारा -करोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत सातारा-कोरेगाव या साताऱ्याचे उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांच्या आदेशान्वये सातारा-कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक व मेढा रस्त्यावरील मोळाचा ओढा येथून फक्त वाहनांना शहरामध्ये प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
शहरात येणारे सर्व मुख्य व इतर छोटे रस्ते पूर्णपणे बंद राहणार असून पुढील आदेश येईपर्यंत या रस्त्यांनी सातारा शहरात प्रवेश करण्यास व शहरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून विनाकारण फिरत असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आणि विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीत करण्यात आलेले हे बदल करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे.