पुणे – छत्रपती संभाजी महाराज पुलावर (लकडी पूल) मेट्रोचे गर्डर जोडण्याचे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 5 ते 10 जानेवारी या कालावधीत पुलावरील वाहतुकीत प्रायोगिक तत्त्वावर बदल करण्यात येणार आहेत. या कालावधीत रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
असा आहे वाहतूक बदल
*कर्वे रस्त्यावरून अलका टॉकीज चौकात जाणारी वाहतूक गुडलक चौकातून नटराज चौक, डेक्कन पीएमपी बसस्टॉपमार्गे भिडे पुलावरून अलका चौकाकडे जाणार आहे.
*जंगली महाराज रस्ता आणि आपटे रस्त्याने येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौकामार्गे रसशाळा चौकातून एस.एम. जोशी पुलावरून गांजवे चौकाकडे जाणार आहे.
*लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्याने येणारी वाहतूक रमणबाग चौक आणि अप्पा बळवंत चैकातून इच्छितस्थळी जाणार आहे.