इस्रोने चंद्रयान-३ मोहीम यशस्वी करत मोठा इतिहास रचला. विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर २३ ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग केले होते. त्यामुळे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडरने आपला १४ दिवसांची यशस्वी कामगिरी पूर्ण केली आहे. त्यानंतर काल सकाळी ८ वाजता त्याला स्लीप मोडवर पाठवण्यात आले आहे. चंद्रावर आता रात्र झाली असून १४ दिवसांनी म्हणजे २२ सप्टेंबरला तिथे दिवस उजाडेल.
सध्या विक्रम लँडरवरील रँप, चास्ते आणि इल्सा, पेलोडस बंद केले आहे. मात्र लँडरचा रिसीवर सुरू आहे. चंद्रयान तीन मोहिमेत लँडरसह पाठवलेले प्रज्ञान रोव्हरला देखील दोन सप्टेंबरला चार्ज झाल्यानंतर स्लीप मोड वर पाठवण्यात आले होते. रात्रीच्या वेळी या ठिकाणी तापमान कमी होतं. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. अशा वेळी ते बंद करण्यात आले आहे. चंद्राचा एक दिवस हा पृथ्वीचा १४ दिवसात इतका असतो. त्यामुळे आता तिथे रात्र सुरू आहे. २२ सप्टेंबरला दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा हे आपले काम करू शकते.
दरम्यान विक्रम लँडरने शनिवारी स्वतःला ४० सेंटिमीटरपर्यंत वर उचलत ३० ते ४० सेंटिमीटर अंतरावर पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग करण्याची कामगिरी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने २३ ऑगस्ट रोजी लँडिंग केल्यानंतर रोव्हर प्रज्ञानची छायाचित्रे आणि वेळ देखील शेअर केली आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले होते की, चंद्र मोहिमेचे रोव्हर आणि लँडर चंद्राच्या रात्री निष्क्रिय केले जातील. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ रोव्हरने ऑक्सिजन, अॅल्युमिनियम, सल्फर आणि इतर साहित्य शोधले असल्याची माहिती इस्रोने दिली होती.