पुणे -चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुल आणि रस्तारूंदीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्यास आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे “मे’ महिन्यातील नवीन पुलाच्या उद्घाटनाचा मुहुर्त “एप्रिल फुल’ ठरणार आहे. चौकातील मुख्य उड्डाणपुल, अंडरपास यासह अन्य कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे आता उद्घाटनाचा नवीन मुहुर्त कधीचा? असा मिश्किल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चौकातील रस्ता रूंदीकरण आणि उड्डाणपूलाच्या कामाला गती मिळाली असून, जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने केला आहे. तर दोन महिन्यांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान चांदणी चौकातील प्रकल्पाचे उद्घाटन दि. 1 मे रोजी करणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र, या दोन महिन्यांत कामाला गती मिळाली असली तरी मुख्य उड्डाणपुल, अंडरपास या कामांना अजून सुरवातही झालेली नाही. त्यामुळे दि.1 मे नक्की मुहुर्त कशाच्या आधारे काढला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ही आहेत उर्वरित कामे…
मुख्य चौकातील उड्डाणपुल
वेदभवन येथील अंडरपास
चांदणी चौक सुशोभिकरण
एनडीएकडून-मुळशी रस्ता
बावधन सर्व्हिस रोडवरील उड्डाणपुल
वेदभवन, बावधन रस्ता रूंदीकरण
जुलै,ऑगस्टनंतरच…
चांदणी चौकातील मुख्य उड्डाणपुलाचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. एका ठिकाणी पिलर उभे केले असून, आणखी दोन ठिकाणी पिलर उभे करण्याचे काम सुरू आहे. वेदभवन येथील अंडपासचेही काम नुकतेच सुरू झाले आहे. ही सर्व कामे पूर्ण होण्यास किमान तीन महिने (जुलै अखेर) लागतील. त्यामुळे उद्घाटनाचा मुहुर्त जुलै अखेर किंवा 15 ऑगस्टनंतरच ठरवावा लागणार आहे.