पुणे – उत्तर भारतातून जाणाऱ्या पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दि. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी हलका ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यामुळे ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या आठवडाभरापासून तापमानात दोन-तीन अंश सेल्सिअस वाढ झाल्याने ऑक्टोबर हिट जाणवत आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अलीकडील निरीक्षणांनुसार पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे हिमालयीन प्रदेश आणि पंजाब, राजस्थान इत्यादी वायव्य राज्यांवर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
या बदलाचा प्रभाव महाराष्ट्रातही दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात परिणामी महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे, असे पुणे येथील हवामान आणि अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
थंड वारे वाहण्याची शक्यता
या चक्रवातामुळे हिमालयीन प्रदेशामध्ये चांगली बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही बाब फायदेशीर ठरणार असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.