पुणे -“राज्याच्या विकासासाठी आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत. त्यामुळे अजितदादांनी कोणती चूक केली? आम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे, असे सांगून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे थांबवा; अन्यथा आम्ही उत्तर देऊ,’ असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिला.
पक्षाचा जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा तसेच पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान आणि शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तटकरे बोलत होते. युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, संभाजी होळकर, रणजित शिवतारे, वीरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.
“पुणे शहरात सुमार दर्जाच्या काही लोकांना अजितदादांनी मोठे केले आहे. ते लोक दादांच्या नेतृत्वाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल कोणी बोलणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. सन 2014 मध्ये भाजपने न मागता बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी मी प्रदेशाध्यक्ष होतो. मग अजित पवार यांनी आता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, तो चुकीचा कसा? असा सवाल तटकरे यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली मात्र, त्यांना टाळण्यात आले याकडे तटकरे यांनी लक्ष वेधले.
कार्यकर्ते म्हणाले…
सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेली फूट ही त्रास देणारी आहे. पक्ष स्थापनेपासून आम्ही पवार घराण्यासोबत आहे. पुन्हा पवार कुटुंबाने एकत्र यावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल
सर्वोच्च न्यायालय आणि राज्य घटनेतील तरतुदीचा कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही राजकीय पक्षांची भूमिका मांडली आहे. हे सर्व प्रकरण निवडणूक आयोगासमोर आहे. त्यामुळे चिन्ह आणि पक्ष कुणाला मिळेल हे निवडणूक आयोग ठरवणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले. निवडणूक आयोग स्वायत्त असून, पक्षाच्या चिन्हाबाबत योग्य ते निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाची भूमिका मांडण्यासाठी सभा घेण्यात येणार आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगाकडे दोन जुलैला आम्ही याचिका दाखल केली आहे. त्यावेळी आयोगाला पक्षाची घटना, घटना दुरुस्ती, सर्वोच्च न्यायालयाचा आणि आयोगाचा यापूर्वीचा निर्णयाची माहिती आयोगाकडे दिली आहे. पक्ष, चिन्हाबाबत योग्यवेळी निर्णय घेईल. आता आम्ही राजकीय भूमिका घेतली त्यावर आयोगाच शिक्कामोर्तब करेल. आयोगाकडे युक्तिवाद करताना आमच्यासोबत किती आमदार, खासदार आहेत याची माहिती नक्कीच देऊ, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली