ठाणे : ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये काल प्रेक्षक ‘हर हर महादेव’ सिनेमा पाहण्यासाठी आले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा चित्रपट बंद पाडला. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या या आंदोलनानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी विवियाना मॉल गाठून चित्रपटाचा शो पुन्हा सुरू केला. यावेळी अविनाश जाधव यांनी शो बंद करून दाखवा असे थेट आव्हान आव्हाडांना दिले. विवियाना मॉलमधील राड्याप्रकरणी आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. वर्तकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परीक्षित विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
संभाजीराजे छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ सिनेमावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीनेही या वादात उडी घेतली. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढले. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये चांगलीच हाणामारी देखील झाली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मध्यस्थी केली. मात्र या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचे कॅमेऱ्यात कैद झालंय.
चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला असल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमची इच्छा काय आहे हे त्यांना कळलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेतल्याचं दाखवलंय ते तसं नाही, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासंदर्भात जे दाखवलं ते इतिहासाला धरुन नाही. अक्षय कुमारला आमचा विरोध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया 16 ते 46 वयाच्या दरम्यानच्या होत्या. अक्षय कुमारचं सध्याचं वय काय आहे, तो दाखवू शकणार आहे का? शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात विकृती का दाखवली जात आहे. शिवाजी महाराजांचा आदर बाजीप्रभू देशपांडे करायचे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.