पॅरिस – फ्रान्सची संसद विसर्जित करण्यात आली असून मुदतपूर्व संसदीय निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल अचानक हा निर्णय जाहीर केला. युरोपीय संसदेच्या निवडणुकीमध्ये मॅक्रॉ यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यामुळे इलेसी अध्यक्षीय राजवाड्यातून देशवासियांना संबोधित करताना मॅक्रॉ यांनी या निर्णयाची घोषणा केली.
संसदेतील भविष्यातील सरकारला पाठिंबा देण्याची एक संधी आपण जनतेला देत आहोत. संसद विसर्जित करण्यात येत असून संसदीय निवडणुका ३० जून आणि ७ जुलै अशा दोन टप्प्यात होतील, असे मॅक्रॉ म्हणाले.
युरोपीय संसदेच्या निवडणुकीचे निकाल रविवारी रात्री जाहीर व्हायला लागले, तेंव्हाच मॅक्रॉ यांच्या पक्षाचा पराभव होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. कडव्या उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पार्टीला मॅक्रॉ यांच्या युरोप समर्थक मध्यममार्गी रिन्यू पक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या. यामुळे युरोपीय संसदेतील मॅक्रॉ यांचे वजन कमी होणार आहे.
फ्रान्समधील विरोधी पक्ष नॅशनल रॅली पार्टी आणि या पक्षाच्या नेत्या मरीन ली पेन यांनी मॅक्रॉ यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. नव्याने होणाऱ्या निवडणुकांचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. त्यांच्या नॅशनल रॅलीने युरोपीय संसदेच्या निवडणुकीत ३० टक्क्यांपेक्षा जास्त किंवा मॅक्रॉ यांच्या प्रो-युरोपियन मध्यवर्ती रिन्यू पक्षापेक्षा दुप्पट जागा जिंकल्या. मॅक्रॉ यांच्या पक्षाला १५ टक्क्यांपेक्षा कमी जागा मिळाल्या.