नवी दिल्ली – पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आपले कार्यालय म्हणजे पंतप्रधानांचे कार्यालय अर्थात पीएमओमधील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना संबोधित केले. पीएओ पॉवर सेंटर नाही तर पीपल्स सेंटर म्हणून विकसित झाले पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधान कार्यालय हे सेवेचे अधिष्ठान असले पाहिजे असा माझा प्रयत्न राहीला आहे. ते मोदींचे कार्यालय न होता, लोकांचे कार्यालय झाले पाहिजे. दहा वर्षांपूर्वी आपल्या देशात पीएमओची एक प्रतिमा तयार झाली होती. पीएमओ हे सत्तेचे केंद्र आहे असे लोकांचे मानणे आहे. ते एक फार मोठे शक्ती केंद्र असते.
मात्र मी सत्तेसाठी जन्माला आलो नाही आणि सत्ता मिळवण्याचा विचार करत नाही. पीएओ हे माझ्यासाठी सत्तेचे केंद्र व्हावे, शक्तीचे केंद्र व्हावे अशी माझी कधीच इच्छा नव्हती आणि तो माझा मार्गही नव्हता. २०१४ पासून आपण या कार्यालयाला स्थायी स्वरूपात बदल घडवून आणणारे कार्यालय बनवण्याचा प्रयत्न केला आहे. येथून ऊर्जेचे प्रसारण होत राहावे अशी आपली इच्छा आहे असे मोदी म्हणाले.
देशातील १४० कोटी जनतेच्या व्यतिरिक्त माझ्या डोक्यात आणि हृदयात अन्य काही नाही. ही १४० कोटी जनता माझ्यासाठी नागरिक नाही तर परमात्म्याचे स्वरूप आहे. जेंव्हा मी सरकारमध्ये बसून कोणता निर्णय करतो तेंव्हा मी विचार करतो की १४० कोटी देशवासियांची मी या रूपात पुजा केली आहे. त्यांच्या चरणाशी एका योजनेच्या माध्यमातून मी पुष्प अर्पण केले आहे.
ज्याच्या आतला विद्यार्थी कायम जिवंत राहतो तोच व्यक्ती यशस्वी होतो. मला निवडणुका आणि अन्य व्यासपीठांवर कायम एक प्रश्न विचारला जातो की मी एवढी ऊर्जा कुठुन आणतो. मी थकत का नाही? माझ्या शरिराचा ते शोध घेत आहेत. मी काय खातो, किती झोपतो, किती योग करतो याचा शोध घेतात.
मात्र ते चुकीच्या मार्गावर आहेत. माझ्या ऊर्जेच्या रहस्यांची त्यांना कल्पना नाही. माझ्या या ऊर्जेचे हे रहस्य आहे की मी आयुष्यभर स्वत:ला विद्यार्थी म्हणून जिवंत ठेवले आहे. जो आपल्यातील विद्यार्थ्याला जिवंत ठेवतो तो कधीच सामर्थ्यहीन होत नाही असे त्यांनी नमूद केले.