कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अधुनमधून हाणामारीचे प्रसंग होत असतात. त्यात आता नव्याने हाणामारीच्या घटनेची भर पडली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्याला भेट दिल्याच्या पार्श्वभुमीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यंमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी पोलिस आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. सार्वजनिक मालमत्तेचे आणि पोलिसांच्या वाहनांचे जमावाकडून नुकसान होऊ नये, म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला.
दिलीप घोष यांच्या भेटी दरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोष यांना काळे झेंडे दाखवल्यामुळे ही हाणामारी सुरू झाली होती. या संदर्भातील अधिक तपशील अद्याप मिळणे बाकी आहे.