संगमनेर – संगमनेर येथील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे शहरातील कॅफेत पुन्हा एकदा एका मुलीवर अत्याचार झाल्याने शहरातील कॅफेत गैरप्रकार चालत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी शहरातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. एप्रिल 2023 ते 21 ऑगस्टदरम्यान आशिष राऊत व किरण सोपान राऊत (दोघे रा. मालुंजकर वस्ती, राऊत मळा, घुलेवाडी) यांनी या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिला फूस लावून संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठलकडा, कऱ्हे घाट अशा विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. त्यानंतर सागर मालुंजकर, कॅफेमालक व लॉज मालक या दोघांनी आशिष व किरण यांना मदत केली आहे.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करत आहे. दरम्यान, या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा शहरातील गोंडस कॅफेच्या नावाखाली बेकादेशीर कृत्य करण्याचा धंदा चालू आहे हे या घटनेतून सिद्ध होत आहे. एकूणच शहरातील अवैध कॅफेचालकांवर कारवाई होऊन ते बंद व्हावे, अशी मागणी होत आहे.