- आयुक्तांनी संधी दिल्यास महापालिकेत नवा पायंडा पडण्याची भीती
पिंपरी – मुदतीमध्ये आपण “ईएमडी’ भरली असून तांत्रिक बाबींमुळे आपणास निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले नसल्याचा कांगावा करत बीव्हीजीच्या ठेकेदारांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र वर्षानुवर्षे पालिकेत ठेकेदारी करणाऱ्यांकडून खरेच चूक झाली की? नौटंकी सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यानंतरही आयुक्तांनी बीव्हीजीला संधी दिल्यास महापालिकेत नवा पायंडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काही निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामध्ये मोशी येथील येथील कचरा डेपोमधील जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यासंदर्भातील 42 कोटी 95 लाखांच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदेची मुदत आज संपुष्टात आली. यासाठी महापलिकेने निश्चित केलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या बीव्हीजीच्या काही लोकांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेत निविदेला मुदतवाढ देण्याची मागणी केली. या मागणीची आयुक्त दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बीव्हीजीकडून तांत्रिक मुद्दा उपस्थित करत आमच्यावर अन्याय होत असल्याचा कांगावा केला.
तसेच आम्ही “ईएमडी’ची रक्कम भरल्यानंतरही सदरची रक्कम महापालिकेकडे वेळेत जमा झाली नाही. निविदेची वेळ संपल्यानंतर ही रक्कम जमा झाल्याचे दिसून येत आहे. मात्र वेळेत रक्कम जमा न झाल्यामुळे आम्ही निविदेत सहभागी होऊ शकलो नाही, असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला. या प्रकरणावर महा ई टेंडरकडे दावा करण्याऐवजी बीव्हीजीने हेतुपरस्पर आयुक्तांकडे केलेल्या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हास्यास्पद दावा
बीव्हीजी ही ठेकेदारी कंपनी देशपातळीवर ठेकेदारीची विशेषत: स्वच्छतेची कामे करत आहे. वर्षानुवर्षे कामे करणाऱ्या या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना निविदा प्रक्रियेबाबत परिपूर्ण माहिती असतानाही त्यांनी केलेला प्रकार जाणीवपूर्वक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महा ई टेंडर ही प्रणाली राज्य शासनाकडून हाताळली जात असताना पलिकेकडे पैसे जमा झाले नाहीत हा बीव्हीजीने केलेला दावाच हास्यास्पद समजला जात आहे.
संधी दिल्यास नवा पायंडा
निविदा भरताना अनेक तांत्रिक अडचणी येतात. मात्र आतापर्यंत या अडचणींबाबत एकही ठेकेदार महापालिका प्रशासन अथवा आयुक्तांकडे तक्रारी घेऊन आलेला नाही. बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पैसे अडकल्याचे सांगितले. मात्र बुधवारी आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली. वेळेत हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास का आणून दिला नाही? असा मुद्दा उपस्थित होत आहे. यानंतरही राजकीय दबावातून आयुक्तांनी बीव्हीजीला संधी दिल्यास महापालिकेत नवा पायंडा पडण्याची भीती असून रोजच असे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे.
आम्हाला संधी दिली पाहिजे – दत्ता गायकवाड
या संपूर्ण प्रकाराबाबत बीव्हीजीचे दत्ता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही मंगळवारी दुपारी 12.57 वाजता पैसे भरले. मात्र ते महापालिकेकडे जमा न झाल्यामुळे आम्हाला निविदा भरता आली नाही. सायंकाळी साडेपाच वाजता हे पैसे जमा झाल्याचे दिसून येत आहे. आम्ही याबाबत आयुक्तांकडे लेखी अर्ज दिला असून त्यांनी आम्हाला संधी द्यायला हवी.