पुणे– पीएमपीने प्रवास करायचा, पण गर्दीत तिकिट काढण्यासाठी वेळ जातो… चिंता नसावी आता घरबसल्या प्रवाशांना “पीएमपी गो’ ऍपवरवरून एका क्लिकवर तिकिट काढता येणार आहे. एवढेच नव्हे, तर पीमपीच्या सर्व मार्गाची माहिती, बसचे वेळापत्रक आणि अन्य सुविधा प्रवाशांना ऍपच्या माध्यमातून मिळणार आहे.
पीएमपीत नुकतीच कॅशलेस सुविधा सुरू झाली. आता “पीएमपी गो’ ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना ज्या बसने जायचे, त्या बसचे शेड्युल पाहून घरबसल्या किंवा कामाच्या ठिकाणावर बसून तिकीट काढता येणार आहे. ज्यावेळी बसने प्रवास करणार, त्यावेळी वाहकाला स्कॅनर दाखवताच तिकीट मिळेल. “पीएमपी गो’ हे ऍप कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबरअखेरपर्यंत ते सुरू केले जाणार आहे.
ऍपवर सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील. सर्व मार्गांची माहितीदेखील यावर मिळणार आहे. बसचे वेळापत्रक आणि पीएमपीचे विविध पास ऍपद्वारे ऑनलाइन काढण्याची सोय आहे, अशी माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.