नाशिक – बुद्धपौर्णिमाच्या निमित्ताने भगवान बुद्धांच्या 100 मूर्ती नाशिक जिल्ह्यातील गावांना दान करण्यात आल्या आहेत. या मूर्ती फायबर मेटलपासून बनविलेल्या असून पाच फूट उंचीच्या आहेत. रथांमधून मिरवणूक काढल्यानंतर या मूर्ती दान करण्यात आल्या. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, बीएमए ग्रुप यांनी या बुद्ध मूर्ती प्रदान सोहळा आयोजित केला होता. शुक्रवारी (दि. 5) बुद्धपौर्णिमा आहे. उत्सवात शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
उत्सवापूर्वी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपतर्फे बुद्धमूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शंभर गावांमधील हजारो नागरिक सहभाग झाले होते.
रंगबिरंगी फुलांनी व निळा झेंड्यांनी सजवलेल्या शंभर रथांमधून या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएस मार्गे गोल क्लब येथे शोभायात्रा काढण्यात आली. यानंतर आयोजित महाबौद्ध धम्म परिषदेत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन्त आर्यनाग यांनी मार्गदर्शन करण्यात आले. तर सायंकाळी सीमा पाटील आणि जॉली मोरे यांचा बौद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.