लंडन, – लंडनमध्ये लॉकडाऊनविरोधात आंदोलन करणाऱ्या किमान 10 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांवर काचेच्या बाटल्या आणि अंड्यांचा भडिमार केला. ब्रिटनच्या नैऋत्येकडील ब्रिटल शहरामध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाला आंदोलकांनी “किल बिल’ असे नाव दिले आहे. शुक्रवारी संध्याकाळीही पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांनी दंगल नियंत्रक पथकाला पाचारण केले होते. जमावाला लाऊडस्पीकरवरून वारंवार इशारे दिल्यानंतर या पथकाने आंदोलकांवर हलका छडीमार केला होता.
पोलिसांवर हल्ले होण्याचा पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि गृहमंत्री प्रिती पटेल यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर वीटा, काचेच्या बाटल्या, अंडी फेकून मारणे सहन केले जाऊ शकणार नाही. यामुळे हिंसाचार भडकू शकतो आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही होऊ शकते, असे जॉन्सन यांनी ट्विटरवर म्हटले आहे. पटेल यांनीही ट्विटरवरच्या पोस्टमधून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे समर्थन केले आहे.