इस्लामाबाद : अगोदरच 1 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज आहे. यात आता इमरान खान सरकारने नव्या कर्जाची भर टाकली आहे. पाकिस्तान सरकार जागतिक बॅंकेकडून आणखी 1.3 अब्ज डॉलरचे कर्ज घेत आहे. यामुळे पाकिस्तानच्या दरडोई कर्जभारात आणखी वाढ होईल. जागतिक बॅंकेआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही पाकिस्तानला पाचशे दशलक्ष डॉलरचे कर्ज दिले.
जागतिक बॅंकेकडून घेत असलेल्या कर्जापैकी 200 दशलक्ष डॉलरचे कर्ज फक्त टोळ धाडीचा बंदोबस्त करण्यासाठी वापरणार असल्याचे पाकिस्तान सरकारने जाहीर केले. कर्जासाठी पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी जागतिक बॅंकेच्या करारावर सह्या केल्या. या सह्या होताच जागतिक बॅंकेने कर्जाची रक्कम लवकरच देणार असल्याचे जाहीर केले.
दोन मोठ्या कर्जांसाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेच्या अनेक अटींना मान्यता दिली. यामुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने मागच्या वर्षी कोरोना संकटात जुलै ते डिसेंबर दरम्यान निवडक आंतरराष्ट्रीय बॅंकांकडून चढ्या व्याजदराने कर्ज उचलले आहे. शिवाय निवडक विदेशी वित्त संस्थांकडून डिसेंबरमध्ये आणखी कर्ज घेतले.
मागील काही महिन्यांत पाकिस्तानची आर्थिक अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यामुळे चीनसह सर्व देशांतील बॅंका आणि वित्तसंस्था पाकिस्तानला कर्ज देणे टाळत आहेत. कर्ज दिले तर मोठे व्याजदर आकारले जात आहेत अथवा तारण म्हणून मोठी मालमत्ता ताब्यात ठेवून बॅंका आणि वित्तसंस्था पाकिस्तानला कर्ज देत आहेत. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबून पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याचा धोका वाढला आहे.