लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आज त्यांची प्रेयसी कॅरी सिमोंडबरोबर एका खासगी समारंभामध्ये विवह केल. रोमन कॅथोलिक वेस्टमिन्स्टर चर्चमध्ये झालेल्या या विवाह समारंभाला दोन्ही बाजूची मित्रमंडळी आणि काही निवडक नातेवाईक उपस्थित होते.
डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने या विवाह समारंभाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुढच्या उन्हाळ्यामध्ये मित्र आणि कुटुंबीयांसमवेत या विवाहाचा आनंद साजरा केला जाणार आहे, असे या प्रवक्त्याने सांगितले.
फादर डॅनिएल हमफ्रेज यांनी या दाम्पत्याला विवाहाच्या मंगल शुभाशिर्वाद दिले. तसेच या दाम्पत्याला वैवाहिक आयुष्याबद्दलच्या मौलिक सूचनाही केल्या. या दाम्पत्याचा मुलगा विल्फ्रेड याचा बाप्तिस्माही यावेळी झाला. विल्फ्रेडचा जन्म गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झाला आहे.
कॅरी जॉन्सन या 33 वर्षीय असून त्यांचा हा पहिलाच विवाह आहे. तर 56 वर्षीय बोरिस जॉन्सन यांच्या त्या तिसऱ्या पत्नी आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या जोडीने प्रथमच आपल्या रिलेशनशीपची सार्वजनिक कबुली दिली होती. केरी जॉन्सन या गर्भवती असल्याचेही त्याच वेळी सांगितले गेले होते.
पंतप्रधान पदावर असताना विवाहबद्ध होणारे बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या गेल्या 300 वर्षांच्या इतिहासातील पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी रॉबर्ट बॅंक्स जेन्कीन्सन हे 1822 मध्ये पंतप्रधान असताना विवाहबद्ध झाले होते.
जॉन्सन यांचा विवाह पूर्वी कलाकार आणि पत्रकार ऍलीग्रा मोस्टीन ओवेन यांच्याशी 1987 साली झाला होता. हा विवाह 1993 पर्यंत टिकला. त्यानंतर ते भारतीय वंशाच्या बॅरिस्टर आणि पत्रकार मारिना व्हिलर यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले. तब्बल 25 वर्षांच्या संसारानंतर 2018 मध्ये या दाम्पत्याने विभक्त होत असल्याची घोषणा केली होती. अखेर 2020 मध्ये त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाले होते.
बोरिस जॉन्सन आणि कॅरी सिमोंडस यांच्या विवाहाला मंत्रिमंडळातील कोणी उपस्थित होते का, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. विवाह समारंभाचा केवळ एकच फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सिमोंडस या 2010 पासून हुजूर पक्षाच्या प्रसिद्धी कार्यालयात काम करत होत्या.
दोन वर्षांनंतर त्यांनी लंडनच्या महापौरपदाच्या फेरनिवडणूकीसाठी जॉन्सन यांच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुखपद सांभाळले आणि 2018 मध्ये ही जबाबदारी सोडली. त्यानंतर त्यांनी ओसियाना या खनिज संवर्धन संघटनेच्या जनसंपर्काच्या कामाला वाहून घेतले.