बीजिंग: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे करोनाच्या साथीला आटोक्यात आणण्यात आलेले स्वतःचे अपयश लपवण्यासाठीच या विषाणूच्या उत्पत्तीचा दोष चीनवर लादू पहात आहेत, अशा शब्दात चीनने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. चीनपासून पुढच्या 30 दिवसात मुक्ती मिळवण्यात अपयशी झाल्यास संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडेल आणि जागतिक आरोग्य संघटनेचे अर्थसहाय्य पूर्ण गोठवण्याचा धमकी वजा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनने या धमकीला प्रत्युत्तर दिले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेबरोबर वाटाघाटी करण्यासाठी अमेरिका करोना विषाणूच्या मुद्दयाचा वापर करत आहे. मात्र अमेरिकेची गैरसमजूत झालेली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी पत्रकारांबरोबरच्या वार्तालापात सांगितले. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेरोस अधानॉम घेब्रेयसिस यांना उद्देशून लिहीलेल्या पत्राबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
अमेरिकेत विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आल्यानेच ट्रम्प अशी स्वैर विधाने करत आहेत. या विषाणूबाबतचा दोष अमेरिका विनाकारण चीनला देत आहे. ही दर्पोक्ती निरर्थक आहे. कोविड-19 अजूनही अमेरिका आणि अन्यत्र पसरतो आहे. अमेरिकेने करोनावरून राजकारण करणे थांबवले पाहिजे आणि या विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला मदत करायला पाहिजे, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
जर अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडून अर्थसहाय्य गोठवणार असेल, तर या संघटनेत चीन अधिकाधिक योगदान देत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.