पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पुण्यात आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपने ‘जुने ते सोने’ या सूत्राचा वापर करण्याचे ठरवले असून, २०१७ मधील तब्बल १०० माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब – पुणे महापालिकेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी पुण्यातील एका हॉटेलमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, राजेश पांडे आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. या बैठकीत पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला आणि जुन्याच अनुभवी नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यावर एकमत झाले असल्याची माहिती आहे. काय आहे भाजपचा ‘फॉर्म्युला’? भाजपने यंदा १२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे ९९ नगरसेवक निवडून आले होते, तर एका अपक्ष उमेदवाराने पाठिंबा दिला होता. त्यानंतर ठाकरे गटातील ५ नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. या सर्व आजी-माजी नगरसेवकांसह १०० हून अधिक उमेदवारांची यादी आता अंतिम करण्यात आली असून, ती लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवली जाणार आहे. पुणे महापालिका २०१७ चे पक्षीय बलाबल: भाजप: ९९ राष्ट्रवादी काँग्रेस: ३९ शिवसेना: १० काँग्रेस: ०९ मनसे: ०२ इतर: ०५