नाशिक : महानगरपालिकांच्या निवडणूकांसाठी भाजपाने मुलाखतींचा पहिला टप्पा पार करताना तयारीला सुरुवात केली. मात्र मध्येच पक्षातील गटबाजी उफाळून आल्याने, भाजपला आगामी निवडणूकांसाठी आपला कर्णधारच बदलावा लागला आहे. महिनाभरापूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुखपदावर आमदार राहुल ढिकलेंची नियुती करण्यात आली होती. मात्र आता भाजपने ढिकलेंना हटवून त्याजागी आमदार देवयानी फरांदेंकडे निवडणूकीची जबाबदारी सोपवली आहे. मात्र वरिष्ठांच्या तडकाफडकी निर्णयाने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशकात भाजपने शंभर प्लसचा नारा दिला आहे. नाशिक महानगरपालिका सर करण्यासाठी प्रभारी म्हणून गिरीश महाजनांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ढिकलेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शहरात असलेल्या देवयानी फरांदे, सीमा हिरे यांसारख्या वरिष्ठ आमदारांना डावलून ढिकलेंवर पक्षाने विश्वास दाखवला होता. त्यानूसार, इच्छूकांच्या मुलाखतींची पहिली फेरी देखील झाली. त्यानंतर मात्र, वरिष्ठ नेत्यांनी आपला निर्णय फिरवताना, ढिकलेंना हटवून देवयानी फरांदेंकडे नाशिकचे निवडणूक प्रमुख बनवले. आस्मान दाखवले नाही तर… नाशिक भाजपमध्ये वर्चस्वासाठी एकमेकांमध्ये चांगलीच चुरस आहे. महानगरपालिका निवडणूकांच्या तोंडावर, एका जाहीर कार्यक्रमात पक्षातील विरोधकांवर ढिकलेंनी टिकास्त्र सोडले होते. ‘मी आजारी असताना, ज्यांनी माझ्या विरोधात काम, माझी रॅली अडवली, त्यांना आस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही. ढाक लावून आस्मान दाखवले नाही, तर नावाचा ढिकले नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांना चांगलेच घेरले. कदाचित याच वक्तव्यामुळे महाजनांनी ढिकलेंना आस्मान दाखविले, अशी चर्चा राजकिय वर्तुळात रंगली आहे.