Shirur : शिरूरमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा होणार सन्मान
Shirur : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ९ ऑक्टोबरला गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा होणार.

Shirur : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिरूर तालुका शाखेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी शिरूर येथील विद्याधाम प्रशालेसमोरील राजभोग बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्याचे हे १५ वे वर्ष आहे.
उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ सिनेअभिनेते सुनील गोडबोले, शिरूरच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पंचायत समितीच्या सभापती स्वाती विठ्ठल घावटे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष सितारामजी लांडगे, शिरूरचे उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ही माहिती शिरूर तालुका संघाचे अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिली.
या उपक्रमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला मदत केली जाणार आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, प्रशासन, कला आणि अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष पत्रकार अर्जुन बढे यांनी केले आहे. यावेळी शहराध्यक्ष बबन वाघमारे, महिला शहराध्यक्ष अश्विनी सांगळे, तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब खपके, सचिन जाधव, उमेश कारखिले यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.





