Pune : दादावाला करंडकात लोकनृत्यांचा रंग; 32 शाळा-महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
Pune : पुण्यातील दादावाला करंडक लोकनृत्य स्पर्धेत १८ शाळा आणि १४ कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग. जाणून घ्या विजेत्या संघांची संपूर्ण यादी.

Pune : भारतीय लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविणारी ‘दादावाला करंडक’ आंतरशालेय व आंतरमहाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धा उत्साहात पार पडली. ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या वतीने आणि ए.एस.डी.बी. दादावाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयोजनाखाली ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात ही स्पर्धा झाली.
‘दादावाला करंडक’ स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष होते. ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या शैक्षणिक क्षेत्रातील १०० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या स्पर्धेत १८ शाळा आणि १४ कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भारतातील विविध राज्ये, प्रांत आणि लोकपरंपरांवर आधारित लोकनृत्ये सादर केली. विविध पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे वैविध्य उपस्थितांसमोर मांडण्यात आले. त्यामुळे सभागृहात उत्साहाचे आणि रंगतदार वातावरण निर्माण झाले.
बक्षीस वितरण समारंभ
बक्षीस वितरण समारंभ ‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’चे अध्यक्ष डॉ. राजेशभाई शाह, उपाध्यक्ष जनकभाई शाह, सचिव हेमंतभाई मणियार, सहसचिव संदीपभाई शाह, दिलीपभाई जगड, विनोदभाई देडिया, खजिनदार महेशभाई धरोड, सहखजिनदार प्रमोदभाई शाह तसेच मंडळाचे विश्वस्त वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते झाला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुजा सेलोट, उपप्राचार्या उन्नती पाढ आणि पर्यवेक्षक मिलिंद गुंजाळ उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेशभाई शाह यांनी भारतीय लोककला आणि सांस्कृतिक परंपरा ही देशाच्या समृद्ध वारशाची अमूल्य ठेव असल्याचे सांगितले. या परंपरांचे जतन करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ‘दादावाला करंडक’ हा भारतीय लोकपरंपरेच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाचे रंगीबेरंगी दर्शन घडविणारा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.
शालेय स्तरावरील स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध कलाकार निधी मेहता आणि राहुल साठे यांनी केले. विजेत्या संघांना चषक आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच जयराज ग्रुपतर्फे सहभागी ३२ शाळा व महाविद्यालयांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात आले.
दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षमा गद्रे आणि दीप्ती सत्यनारायण यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अर्चना काळे आणि अमृत शेजवलकर यांनी विशेष योगदान दिले.
‘दि पूना गुजराती केळवणी मंडळा’च्या शताब्दी वर्षाच्या वाटचालीत ‘दादावाला करंडक’ हा भारतीय लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचा उत्सव ठरला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ देतानाच भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विजेते, शालेय स्तर :
प्रथम : नाणे माध्यमिक विद्यालय, मावळ
द्वितीय : हुजूरपागा सेकंडरी स्कूल, कात्रज
तृतीय : रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल
कनिष्ठ महाविद्यालयीन स्तर :
प्रथम : फर्ग्युसन कॉलेज, लक्ष्मी रोड
द्वितीय : हुजूरपागा
तृतीय : हुजूरपागा, कात्रज





