Rahul Gandhi : राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनवती’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर आता भाजपने पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. भाजपने एक्स अकाऊंटवर राहुल गांधी यांचा एक पोस्टर शेअर करत ‘फ्यूज ट्यूबलाइट’ असा उल्लेख केला आहे.
भाजपच्या एक्स हँडलवरून शेअर केलेल्या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांचे ‘फ्यूज ट्यूबलाइट’ असे वर्णन केले आहे. पोस्टरमध्ये वरच्या कोपऱ्यात ‘काँग्रेस प्रेझेंट्स’ लिहिलेले आहे, तर त्यानंतर ‘मेड इन चायना’ असेही लिहिले आहे. याशिवाय, पोस्टरमध्ये खाली मोठ्या अक्षरात ‘राहुल गांधी इन अँड एज ट्यूबलाइट’ असे लिहून भाजपने काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Fuse Tubelight pic.twitter.com/SQax9wdZhQ
— BJP (@BJP4India) November 24, 2023
अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाइट या चित्रपटाच्या पोस्टरनुसार हे पोस्टर एडिट करून तयार करण्यात आले आहे. यामध्ये सलमान खानच्या जागी राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला आहे. यासोबतच, भाजपने पोस्टरमध्ये ‘काँग्रेस प्रेझेंट्स, मेड इन चायना, राहुल गांधी अँड एज ट्यूबलाइटमध्ये’ असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. या सामन्याच्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होते. या घटनेचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी राजस्थानमधील प्रचारसभेत मोदींचा उल्लेख पनवती असा केला होता. तर, ‘पंतप्रधान लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवतात आणि उद्योगपती गौतम अदानी त्यांचे खिसे भरतात. अशा प्रकारे पाकीटमारी चालते’, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. . शनिवारी संध्याकाळपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. त्यानंतर आता भाजपने देखील राहुल गांधी यांच्यावर या पोस्टरद्वारे निशाणा साधला आहे.