जयपूर – राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (rajasthan election) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपमधील नाराजी उफाळून आली. तिकीट न मिळालेल्या काही नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर राजस्थानात भाजपला 50 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा दावा केला.
उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या 5 इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी स्वपक्षाविरोधात निदर्शने केली. त्या निदर्शनांवेळी पक्षाच्या झेंड्यांचे दहन करण्यात आले.
भाजपने माजी आमदार राजपालसिंह शेखावत यांच्या ऐवजी खासदार राज्यवर्धनसिंह राठोड यांना एका मतदारसंघात उमेदवारी दिली. त्यामुळे शेखावत समर्थकांनी राठोड यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करत निदर्शने केली.
भाजपला 40 ते 50 जागांवरील विजयावरच समाधान मानावे लागेल, अशी उपरोधिक प्रतिक्रिया उमेदवारी नाकारण्यात आलेल्या मुकेश गोयल यांनी दिली.
उमेदवारी न मिळालेल्या आणि दोनवेळा आमदार बनलेल्या नेत्या अनिता सिंह यांनी निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेतली आहे.
राजस्थानात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत.
त्यातील 41 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी भाजपने सोमवारी जाहीर केली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजीला तोंड फुटल्याने पुढील उमेदवार निवडताना भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.