भाजप “हवेत’, राष्ट्रवादी “गॅस’ वर अन्‌ नेते आशेवर! 

मतदार कोणाला कौल देणार अन्‌ कुणाचा निकाल लावणार याचे अंदाज लागले रंगू 

नगर – नगर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू रंग धरत आहे.मतदारांचा कानोसा अन्‌ राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला तर नगरमध्ये भाजप सध्या “हवेत’ असल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादी उमेदवाराच्या घोषणेपासून पक्षात सुरू झालेली चर्चा नगरमध्ये उमेदवार नाही तर प्रत्यक्ष पक्षच गॅसवर असल्याचे प्रत्यंतर देणारी आहे. दुसरीकडे मतांची बेगमी वाढेल, अशा आशेवर दोन्ही पक्षांचे नेते असल्याचे दिसत आहे. मतदारांची चर्चासुद्धा याच अंगाने फिरत असल्याने मतदार कुणाला कौल देणार व कुणाचा निकाल लावणार, याचे अंदाज आता रंगत आहेत.

2004 ची लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर तीन निवडणुकीत भाजपचे एक हाती साम्राज्य निर्माण झाले. अर्थात मतांचे झालेले विभाजन व मोदी लाटेमुळे तीन वेळा भाजपचा खासदार झाला.परंतू यंदा तीन वेळा खासदारकीची माळ गाळ्यात घालणाऱ्या खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपला सातत्याने मिळालेल्या विजय व विखेंच्या उमेदवारीमुळे भाजपमध्ये वाढलेल्या आत्मविश्‍वासासोबतच काही पदाधिकाऱ्यांमध्ये बेफिकिरीही आली आहे. त्यामुळेच 2019 ची निवडणूक ही सहज सोपी असल्याचा दावा करीत हे पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या “हवेत’ आहेत.

शिवसेनेसारख्या मित्रपक्षालाही कामापुरते’ अशा स्वरूपाची मिळणारी वागणूक ही त्यांचा “हवे’चा परिणाम आहे. विशेष म्हणजे, पक्षातील अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनाही गृहीत धरण्याचे बेफिकिरीचे प्रमाण वाढले असल्याची प्रांजळ कबुली अनेक जण खासगीत देतात.त्यामुळे सध्या तरी हवेतच गणिते मांडली जात आहेत; मात्र हे राजकारण आहे, त्याची हवा कधीही बदलते, याची जाणीवही असणे तेवढेच गरजेचे असल्याची अनेक मतदारांची भावना खूपच बोलकी आहे.
यात डॉ. विखे यांच्याकडून शिवसेना व भाजपला बरोबर घेवून जाण्याचा प्रयत्न होत नाही. भाजपच्या मेळाव्याला शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते दूर असतात. तर शिवसेनेच्या बैठकीला भाजप नेते नसतात. त्यामुळे डॉ. विखे यांची स्वतंत्र यंत्रणेवर काहीशी मदार असल्याचे दिसत आहे. स्थानिकपातळीवर राजकारणाकडे लक्ष न देता डॉ. विखे पुढे चाल आहे. त्यामुळे नेते व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या स्वभावाबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्‍त होत आहे.

राष्ट्रवादीने शेवटपर्यंत उमेदवार ठरविण्याचा घोळ घातला अन्‌ आमदार संग्राम जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीचा हार टाकला. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील वातावरण हे चैतन्याऐवजी चिंतेचेच होते. अर्थात राष्ट्रवादीची नगर दक्षिणेत मोठी ताकद असली तरी कॉंग्रेस नगन्यच आहे. त्यात राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कुरबुरी मोठ्या प्रमाणावर आहेत. या कुरबुरीवर मात करण्याची रणनिती खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आखत आहेत.

पवार यांनी या मतदार संघात लक्ष देवून दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे उमेदवार पक्षातील गटबाजीचा विचार न करता प्रचारावर भर देत आहे. आ. जगताप यांच्या जवळीचे मंडळी आपली प्रतिष्ठा सांभाळू लागल्याने अन्य नेते व कार्यकर्त्यांमधील दूरावा वाढला आहे. सध्या राष्ट्रवादीच्या प्रचारही जशी दिशा मिळेल, तसा सुरू आहे. प्रचारासाठी ना नियोजन आहे ना समन्वय, स्थानिक नेत्यांचाच आधार घेत त्या-त्या तालुक्‍यात होणाऱ्या बैठका अन्‌ सभा यावरच राष्ट्रवादीचा भर असून, एकसंधपणे कुठेही प्रभाव जाणवेल, अशा प्रचाराचा सध्या तरी अभावच दिसून येतो. 2014 च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने दिलेली लढत ही वाखाणण्याजोगी होती. आता तशी तरी लढत होईल का,अशी चिंता खुद्द राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्‍त केली जात असल्याने पक्षाचे अस्तित्वच “गॅस’वर आहे. येणाऱ्या काही दिवसांत ही परिस्थती सुधारेल, अशी अपेक्षाही कार्यकर्त्यांना आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.