कॉंग्रेस आघाडीची निवडणूक समन्वय समिती कागदावरच

समितीमध्ये दोन्ही पक्षांचे प्रत्येक तीन सदस्य असणार
अजूनही ताळमेळ बसला नसल्याचे चित्र : कॉंग्रेसकडून मिळेनात सदस्यांची नावे  

नगर – लोकसभा निवडणूक प्रचाराची धामधुम आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. नगर दक्षिणेसह शिर्डी लोकसभा मतदारसंघ युतीच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. परंतू हे जरी खरे असले तरी या दोन्ही पक्षात अजूनही ताळमेळ बसला नसल्याचे चित्र समोर आले आहे. या निवडणुकीसाठी समन्वय समिती स्थापन करण्याचे आदेश खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. परंतू अजूनही ही समिती अस्तित्वात आली नाही. त्या आदेशानंतर पवार यांचा दुसरा दौरा या मतदारसंघात झाला.

नगर व शिर्डी दोन्ही लोकसभा मतदारसंघात आघाडीची निवडणूक समन्वय समिती स्थापन करण्याचे सांगण्यात आले आहे. सहा जणांच्या या समितीमध्ये दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. या समितीच्या माध्यमातून बैठका, मेळावे व प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा तसेच पक्षांतर्गत असलेली दुखणी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार होता. या समितीकडून पवारांना दोन्ही मतदारसंघाचा आढावा देखील देण्यात येणार होता. त्यासाठीच ही समिती स्थापन करण्याचे सांगण्यात आले होते. गेल्या 25 मार्च रोजी शरद पवार यांनी नगर मतदारसंघात पहिला दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. मतदारसंघात दोन्ही कॉंग्रेसने एकत्रित लढण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यावेळी समिती स्थापन करण्याचे सांगितले होते. परंतू दहा दिवसांनी पवारा पुन्हा नगरला येवून गेले तरी ही समिती स्थापन झालेली नाही.

शरद पवार आल्यानंतर कॉंग्रेसचे नेते मंडळी सभा उपस्थित राहत आहेत. परंतू पक्षाचे अन्य नेते व कार्यकर्ते मात्र यापासून दूर असल्याचे दिसत आहे. शेवगावच्या सभेला कॉंग्रेसचे नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. परंतू शेवगाव व पाथर्डी तालुक्‍यातील नेते व कार्यकर्ते मात्र या सभेला फिरकले नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांपर्यंत सभेचे निरोप गेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात या निवडणुकीत कोणी निरोपाची वाट न पाहता काम सुरू करावे असे आदेश पवारांसह थोरातांनी दिले आहेत. तरी अजूनही कार्यकर्ते निरोपाची वाट पाहत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून समिती सदस्यांची नावे तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतू कॉंग्रेसकडून नावे मिळत नसल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी ही नावे देणे अपेक्षित आहे. परंतू ते अजूनही कॉंग्रेस अंतर्गत थोरात व विखे गटाच्या वादातून बाहेर पडले नाही. त्यामुळे कोणाची निवडणूक समन्वय समितीमध्ये निवड कराव, या संभ्रमात असल्याचे दिसत आहे. थोरातांबरोबर चर्चा करून ही नावे दिली तर विखे नाराज होण्याची शक्‍यता असल्याचे ससाणेंना वाटण्याची शक्‍यता आहे.

नगर व शिर्डी दोन्ही मतदारसंघात समिती नसल्याने दोन्ही कॉंग्रेसमध्ये समन्वय साधण्यात अडचणीत येत आहे. सध्या तरी दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना नेते व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा लागत आहे. तेच समन्वय समिती स्थापन झाल्यास कामांची विभागणी होवून नेते व कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे शक्‍य होईल. दरम्यान सध्या तरी दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना देखील या समितीचा विसर पडला आहे. त्यामुळे ही समिती स्थापन झाली नसल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.