कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर ६ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रं दाखवून शासकीय कोट्यातली सदनिका लाटल्याने न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे. कोकाटे यांचे मंत्रिपद रिक्त झाल्याने त्याजागी कोणाची वर्णी लागणार, याविषयी तर्कवितर्क लावले जात असून 6 नावे चर्चेत आहेत. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्यांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांच्यासह प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप, सुनील शेळके यांनाही मंत्रिपदाची संधी मिळू शकते. एपस्टीन फाईल्स उघड होणार; बिल गेट्स दिसले महिलेसोबत अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सच्या डेमोक्रेट्सने गुरुवारी दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या कागदपत्रातील ६८ नवीन फोटो सार्वजनिक केले. हे फोटो प्रसिद्ध करण्याचा उद्देश एपस्टाईनचे प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करणे आहे. त्यात मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, फिल्ममेकर वुडी एलन, गूगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन, फिलॉस्फर नोम चॉम्स्की आणि ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव बॅनन यांच्यासह अनेक लोक दिसत आहेत. जारी केलेल्या २ फोटोत बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहे. एपस्टीनजवळ सापडलेल्या साहित्यात रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका, लिथुआनियासारख्या देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि ओळखपत्रे आढळली आहेत. सोबत टेक्स्ट मेसेजच्या स्क्रिनशॉट्समध्ये मुली पाठवणे आणि १ हजार डॉलर प्रति मुलगी अशी किंमत असल्याचं दाखवण्यात आले आहे. उद्या राज्यातील २४ नगरपरिषदांसाठी मतदान राज्यातील २६४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान झाले. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर सर्वच ठिकाणी २१ डिसेंबर मतमोजणी होईल. गोळीबाराच्या घटना अन् चर्चांना उधाण; रोहित पवारांनी दिले स्पष्टीकरण अहिल्यानगमधील जामखेडमध्ये एका हॉटेलवर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात हॉटेल मालक रोहित अनिल पवार हे जखमी झाले होते. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. परंतु या गोळीबारात जखमी झालेल्या हॉटेल मालकाचे नाव रोहित पवार असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. अनेकांना आमदार रोहित पवार यांच्यावर गोळीबार झाल्याचं वाटलं. मात्र या गोळीबार प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण सुखरुप असल्याचं सांगितलं. तसेच प्रत्येक व्यक्ती मीच आहे असं समजून त्यांना न्याय मिळण्यासाठी मी कायम लढतो आणि लढत राहील, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून भाजप सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल काँग्रेसने हरियाणा विधानसभेमध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हरियाणात भाजपला मोठा विजय मिळवून वर्ष उलटत नाही तोच राज्यातील नायाब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आलंय. विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारली आहे. त्यामुळे शुक्रवारी विधानसभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. शुक्रवारी या अविश्वास प्रस्तावावर विधानसभेत चर्चा होणार आहे. त्यानंतर त्यावर मतदान होईल आणि या मतदानामधून राज्य सरकारला बहुमत आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४८, काँग्रेसला ३७ आणि आयएनएलडीला २ तर अपक्षांना तीन जागा मिळाल्याअसल्याने सध्या बहुमत सैनी सरकारच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे वाटप करत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर एक हिजाब घातलेली तरूणी नियुक्तीपत्र घेण्यासाठी हजर झाली. त्यावेळी नितीश कुमार यांनी बोलताबोलता अचानक त्या तरूणीचा हिजाब तोंडावरून खाली खेचला. मात्र काहींनी याप्रकर्णच धर्माशी कनेक्शन लावत, नितीश कुमारांना धमकीही दिल्याचे दिसून आले. या सर्व घडलेल्या घटनेनंतर नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवण्याच निर्णय घेण्यात आला आहे. , बिहार पोलिस महासंचालक आणि इतर उच्च अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे आणि सुरक्षा अधिक कडक शिस्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरले भारत मॉडेल भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मोफत योजना सुरू केल्या आहेत. ज्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत झाला. भारताचं हेच मॉडेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत लागू करण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे आता अमेरिकेमधील 14.5 लाख सैनिकांच्या बँक खात्यामध्ये ख्रिसमसपूर्वी प्रत्येकी 1,776 डॉलर म्हणजे जवळपास 1.6 लाख रुपये जमा करणार आहेत. या योजनेला त्यांनी ‘वॉरियर डिव्हिडेंट’ असं नाव दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे, यामधून अमेरिकेला जो फायदा झाला आहे, त्या पैशांमधून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेमध्ये अशा योजना सुरू करत असल्याचं बोललं जात आहे. बांगलादेशात पुन्हा आंदोलन सुरू; शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर समर्थक आक्रमक बांगलादेशमध्ये ‘इन्कलाब मंच’चे युवा नेते शरीफ उस्मान हादी यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये १२ डिसेंबर रोजी शरीफ उस्मान हादी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञातांनी गोळीबार केला होता. हादी यांच्यावर सिंगापूरमधील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता हादी यांचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तसेच काही भागात जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हादी हे बांगलादेशातील विद्यार्थी नेते म्हणून उदयास आले होते. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात हादी सहभागी होते. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील पाचवा सामना होणार का? टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20I सामना बुधवारी 17 डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये होणार होता. मात्र हा सामना तब्बल 6 वेळा पाहणी केल्यानंतर टॉसविना रद्द करण्यात आला. लखनौतील धुक्यांमुळे हा सामना होऊ शकला नाही. यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्याची प्रतिक्षा आहे. मालिकेतील पाचवा सामना हा 19 डिसेंबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यादरम्यान अहमदाबादमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामना निकाली निघण्याची पूर्ण शक्यता असल्याने चाहत्यांची चिंता मिटली आहे. शिल्पा शेट्टीच्या घरावर आयकर विभागाचा छापा अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. शिल्पाच्या बंगळुरूमधील प्रसिद्ध हॉटेल बास्टियन गार्डन सिटीशी संबंधित एका प्रकरणाबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभाग केवळ मुंबईतीलच नाही तर बेंगळुरूमधील हॉटेलच्या ठिकाणीही छापे टाकत असल्याचीही माहिती समोर आली आहे. बास्टियन गार्डन सिटी हॉटेलच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता आल्याच्या तक्रारींनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत.