मुंबई: बुधवारी भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रात घसरण झाली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक किरकोळ घसरणीसह लाल निशाणावर बंद झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSU Bank) आणि संरक्षण क्षेत्रातील (Defence Sector) समभागांमध्ये झालेल्या मोठ्या विक्रीमुळे बाजारावर दबाव दिसून आला. दिवसाच्या सुरुवातीला ८५,१५० च्या पातळीवर व्यवहार सुरू करणाऱ्या सेन्सेक्समध्ये ३१ अंकांची किरकोळ घसरण नोंदवली गेली आणि तो ८५,१०६ च्या पातळीवर बंद झाला. ही घसरण ०.०३ टक्के होती. दुसरीकडे, निफ्टी ५० ने २६,००४ वर ओपनिंग दिली. दिवसअखेरीस ४६ अंकांच्या घसरणीसह तो २५,९८६ च्या पातळीवर स्थिरावला, म्हणजे ०.१८ टक्क्यांची घसरण झाली. बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांना मोठा फटका बसला. बीएसई मिडकॅप ०.९४ टक्क्यांनी घसरला, तर बीएसई स्मॉलकॅपमध्येही ०.४२ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. ‘टॉप गेनर्स’ आणि ‘टॉप लूजर्स’ – आज निफ्टी ५० मधील समभागांमध्ये मोठी चढ-उतार दिसून आली. सर्वाधिक तेजी विप्रो मध्ये (१.८१ टक्के वाढ) तर त्यानंतर टीसीएस (१.४२ टक्के), आयसीआयसीआय बँक (१.३५ टक्के), हिंदाल्को (१.१८ टक्के) आणि इन्फोसिस (१.१४ टक्के) या समभागांनी चांगली कामगिरी केली. परंतु, सर्वाधिक नुकसान मॅक्स हेल्थकेअर (२.८२ टक्के घसरण) ला झाले. त्याखालोखाल अदानी एंटरप्रायझेस (२.२३ टक्के), भारत इलेक्ट्रॉनिक्स (२.२१ टक्के), टाटा कंझ्युमर (१.९२ टक्के) आणि श्रीराम फायनान्स (१.८२ टक्के) हे समभाग ‘टॉप लूजर्स’ ठरले. क्षेत्रनिहाय बाजाराची स्थिती – आज आयटी आणि खासगी बँकिंग क्षेत्राने बाजाराला काहीसा आधार दिला. निफ्टी आयटी मध्ये ०.७६ टक्के तर निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये ०.५७ टक्के तेजी दिसून आली. याउलट, विक्रीचा सर्वाधिक जोर निफ्टी पीएसयू बँक (३.०७ टक्के घसरण) आणि निफ्टी इंडिया डिफेन्स (१.८३ टक्के घसरण) या क्षेत्रांमध्ये होता. याशिवाय, निफ्टी कॅपिटल मार्केट (१.८१ टक्के), निफ्टी ऑटो (१.२० टक्के), आणि निफ्टी इंडिया कंझ्युमर (१.०८ टक्के) यांसारख्या क्षेत्रांमध्येही १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.