मुंबई – आपल्या देशात पत्रकारीतेला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तसेच आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहे. पत्रकारीता ही जबाबदारीपूर्णच असायला हवी. मात्र त्यात न्यायालय कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टीच्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत.
राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही त्याची पत्नी आहे. त्यामुळे राज याला अटक केल्यानंतर या प्रकरणाशी शिल्पाचाही संबंध जोडला जात आहे. मात्र, या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असे शिल्पा सांगत आहे.
यानंतरही तिच्या विरोधात काही चॅनेल आणि युट्यूब चॅनेलवर शिल्पाचा संबंध लावून बातम्या प्रसिद्ध करत आहेत. या विरोधात शिल्पा शेट्टीने मुंबई हायकोर्टात सिव्हिल सूट दाखल केला होता.
या प्रकरणी आज (30 जुलै) सुनावणी पार पडली. यात शिल्पाच्या सर्व मागण्या न्यायालयाने फेटाळून लावण्यात आल्या आहेत. तसेच शिल्पा शेट्टीला सध्या कोणताही अंतरिम दिलासा देता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.