Dimbhe Dam: कातकरी-ठाकर बांधवांना १५ दिवसांत जागा सोडण्याची नोटीस; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

प्रभात वृत्तसेवा
डिंभे – जलसंपदा विभागाच्या जागेत निवारा बांधून राहणाऱ्या कातकरी-ठाकर बांधवांना १५ दिवसात जागा सोडण्याबाबत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळच्या डिंभा धरण विभाग, मंचर यांनी नोटीस बजावली आहे. तर, आदिवासी बांधवांना निवाऱ्यापासून बेदखल केल्यास सोमवारी दि. १५ रोजी दुपारी ११ वाजता तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळच्या डिंभा धरण विभाग, मंचर यांनी दि. 3 रोजी डिंभा धरण क्षेत्रात असणाऱ्या महामंडळाच्या जमिनीवर जे लोक अतिक्रमण करून राहात आहेत. अशा लोकांना १५ दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याच्या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कातकरी व ठाकर बांधवांचा समावेश आहे.
या लोकांना स्वतःच्या जमिनी नसल्याने गेल्या 30-40 वर्षांपासून हे लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या लोकांना कायमस्वरूपी निवारा देण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना प्रशासनच त्यांना बेघर करत असल्याचा पक्ष निषेध करत आहे.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थ व गावकरी यांच्या सहकार्यातून पिंपळगाव, फुलवडे,शिनोली येथील बेघर कातकरी बांधवांना घरासाठी जागेचा प्रश्न सोडवला गेला असून या ठिकाणी असणाऱ्या बांधवांना घरकुले मंजूर झालेली आहेत. इतर ठिकाणी असणाऱ्या बांधवांचा प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या निवार्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही बांधवांना त्यांच्या आता रहात असणाऱ्या निवाऱ्यापासून बेदखल करण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश घोलप यांनी उपविभागीय अधिकारी मंचर यांच्याकडे विनंती केलेली आहे.
या बाबत तातडीच्या मिटिंगचे आयोजन करण्यात येऊन जर हा प्रश्न सोडवला गेला नाही तर सोमवार, दि.१५ रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालय घोडेगाव या ठिकाणी संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रवीण पारधी यांच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाशराव घोलप, शरद सहकारी बँकेचे संचालक मारुती लोहकरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ काळे, तळेघर सोसायटीचे चेअरमन हनुमंत इष्टे, राजपूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दूंदा जढर, सुनील दादा ठोसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





