समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा – शिंदे गटाचे नगरसेवक कॉंग्रेस नेत्याच्या कार्यक्रमाला गेल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांच्या सत्काराला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, “हम सबके है’ असेच दर्शविण्याचा प्रयत्न असल्याचे लपून राहिलेले नाही.
गुरुवारी (दि.12) पारनेरचे आमदार नीलेश लंके श्रीगोंद्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, रमेश लाढाणे, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, बापू गोरे, अंबादास औटी यांनी राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके यांची भेट घेत सत्कार केला. हा कार्यक्रम पत्रकार मंडळींचा असल्याचे लक्षात येताच या नगरसेवकांनी तिथून काढता पाय घेतला. मात्र, याची राजकीय पटलावर वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या नेत्यांची कार्यकर्त्यांवरील पकड ढिली झाली की काय असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे.
लोकसभा निवडणुकीला अवकाश असला तरी आ. लंके लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा आत्तापासूनच रंगू लागल्या आहेत. आ. लंके यांच्या सत्काराची घटना छोटीशी असली तरी त्याचे वेगवेगळे कंगोरे आता चर्चेत आले आहेत. एकीकडे खा.डॉ.सुजय विखे पाटील श्रीगोंदेत आले की हेच नगरसेवक त्यांच्या मागे पुढे असतात. आता विखे-लंके यांचे द्वंद्व जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चेत असताना या नगरसेवकांनी आ. लंके यांचा सत्कार करण्याचे प्रयोजन काय असू शकते, हाही मुद्दा यानिमित्त समोर आला आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात शिंदे गटात प्रवेश केलेल्या गणेश भोस यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सत्यजित तांबे यांचा सत्कार केला होता. या सत्काराची चर्चा थांबत नाही तोवरच भाजपच्या नगरसेवकांनी आ. लंके यांचा सत्कार केल्याने तालुक्यातील नेतेमंडळींच नेमकं चाललयं तरी काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
नगरसेवकांकडून इन्कार
आ. नीलेश लंके यांच्या सत्कारापाठीमागे कुठलाही राजकीय उद्देश नव्हता. आ. लंके हे बापू गोरे यांच्या हॉटेलवर आल्याचे समजल्याने आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी गेलो होतो, असे नगरसेवकांनी स्पष्ट केले.