मुंबई – सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी सुरु आहेत. मनसे आणि ठाकरे गटाने एकत्र यावं असं अनेक काय्कर्त्यांना वाटत होत. तशा आशयाची फ्लेक्सबाजी देखील विविध जिल्ह्यांमध्ये झाल्याचे दिसून आले होते. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याचे समजते.
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता विविध प्रकारच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.
एकीकडे मनसे नेते अभिजित पानसे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेत त्यांच्या गाडीतून प्रवास केला होता. त्यानंतर या दोन्हही पक्षांमध्ये युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशात राज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने या दोन्हही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज्यामध्ये विविध पक्षांमध्ये युती आणि आघाड्या सुरु असताना राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाली. मुंबईत होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट अतिशय महत्वाची ठरणार आहे. भेटीमागचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी राज ठाकरे यांनी वयक्तिक कारणासाठी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे.