मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी या वयात त्यांच्या पक्षातील बंडखोरीविरोधात चालवलेला लढा प्रेरणादायी आहे, असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी 82 वर्षाचा असलो काय आणि 92 वर्षांचा असलो काय आपण सक्रियपणे कार्यरत राहु असे पवार म्हणाले आहेत. हेच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे असे राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे 84-86 वर्षांचे होते.तेव्हाही आम्ही त्यांच्याकडून प्रेरणा घेत होतो. वय म्हणजे काय? महात्मा गांधी म्हातारे झाले होते, पण तरीही ते इंग्रजांविरुद्ध लढले, असे राऊत म्हणाले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा जवळ येण्याची शक्यता आहे काय असे विचारता ते म्हणाले,
“की ते दोघेहीं भाऊ असल्याने ते आपसात चर्चा करू शकतात, त्यासाठी कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी गुरुवारी राऊत यांची भेट घेतली,
ज्यामुळे महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुरावलेल्या ठाकरे चुलत भावांमध्ये संभाव्य समझोता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पानसे यांनी मात्र उद्धव यांच्यासोबत युतीसाठी राज यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आणल्याचे नाकारले आहे.