Kamalnath : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका देण्यात आली नव्हती. अखेर काँग्रेसकडून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली असून कमलनाथ भाजपामध्ये जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी सांगितले की, “मी स्वत: कमलनाथ यांच्याशी बोललो असून त्यांनी आपण कोठेही जाणार नाही,” आणि कॉंग्रेस मध्येच राहणार आहोत असे स्पष्ट केले आहे.
कमलनाथ आणि त्यांचे पुत्र खासदार मुलगा नकुल नाथ भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांनी रंगवली आहे. त्याचा पटवारी यांनी कमलनाथ यांच्यावतीनेच अधिकृतपणे इन्कार केला आहे. ते म्हणाले की, “भाजप मीडियाचा गैरवापर करते आणि एका व्यक्तीच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. मी कमलनाथजी यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितले की मीडियामध्ये फिरणारे वृत्त एका कटाचा भाग आहे.”
“त्यांनी मला सांगितले की ते काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसमध्येच राहणार आहेत असे पटवारी यांनी रविवारी संध्याकाळी पीटीआयला सांगितले. गांधी घराण्याशी त्यांचे नाते अतूट आहे. ते काँग्रेसच्या विचारधारेसोबत जगले आहेत आणि शेवटपर्यंत कॉंग्रेसबरोबरच राहतील हे त्यांनी मला सांगितले,” असे पटवारी यांनी स्पष्ट केले.
कमलनाथ स्वत: आपली बाजू का मांडत नाहीत, असे विचारले असता पटवारी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री योग्य वेळी बोलतील. “मी जे काही बोललो ते त्यांच्या वतीनेच होते,” असा दावा त्यांनी केला.ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि कमलनाथ यांचे सहकारी दिग्विजयसिंह यांनीही म्हटले आहे की कमलनाथ कॉंग्रेस सोडणार नाहीत.
दरम्यान, दिल्लीत कमलनाथ यांचे निकटवर्तीय समजले जाणारे काँग्रेस नेते सज्जन सिंग वर्मा यांनी सांगितले की कमलनाथ हे लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चीत करण्याच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यांनी पक्षाच्या तिकीट वाटपावर लक्ष केंद्रीत केले आहे असे वर्मा म्हणाले. पण स्वता कमलनाथ माध्यमांपुढे येऊन हे का स्पष्ट करीत नाहीत असे विचारता वर्मा म्हणाले की ही बातमी प्रसार माध्यमांनी पसरवली आहे, त्यामुळे तेच याचा खुलासा करतील अशी भूमिका कमलनाथ यांनी घेतली आहे.