Brisbane Heat Won Big Bash League 2023-24 : ब्रिस्बेन हीटने बिग बॅश लीगच्या 13व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. विजेतेपदाच्या लढतीत वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनने ब्रिस्बेन हीटसाठी अप्रतिम गोलंदाजी करून संघाला मोठे यश मिळवून दिले. जॉन्सनने 4 षटकात 26 धावा देत 4 बळी घेत विरोधी संघाला विजयाची रेषा ओलांडण्यापासून रोखले. स्पेन्सर जॉन्सन हा सामन्याचा मानकरी ठरला. सिडनी सिक्सर्स विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ब्रिस्बेन हीटने एकतर्फी विजय मिळवला.
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जी त्यांच्यासाठी मोठी चूक ठरली. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ब्रिस्बेन हीट संघाने 20 षटकांत 8 गडी बाद 166 धावा केल्या. सलामीवीर जोश ब्राऊनने संघाकडून सर्वात मोठी 53 धावांची खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सचा संघ 17.3 षटकांत सर्वबाद 112 धावांत आटोपला. अशाप्रकारे ब्रिस्बेन हीटने हा सामना 54 धावांनी जिंकला.
Your night, Brisbane 🏆 #BBL13 pic.twitter.com/BhwL577O0W
— KFC Big Bash League (@BBL) January 24, 2024
संपूर्ण सामन्याची स्थिती…
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीट संघाने 20 षटकात 8 बाद 166 धावा केल्या. जोश ब्राऊनने संघाकडून सर्वात मोठी 53 धावांची खेळी खेळली. याशिवाय मॅट रेनशॉने 40 धावा केल्या. मात्र, संघाचे खालच्या फळीतील तीन खेळाडूही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. या काळात सिडनी सिक्सर्सच्या सीन अॅबॉटने सर्वाधिक 4 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सिडनी सिक्सर्सची सुरुवात खराब झाली. सिडनी सिक्सर्सने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर डॅनियल ह्युजेसची (01) विकेट गमावली. त्यानंतर चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॅक एडवर्ड्स (16)ही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर डाव सावरत असतानाच संघाने 9व्या षटकात 56 धावसंख्या असताना जोश फिलिपची विकेट गमावली. त्यानं 23 धावांची खेळी केली. यानंतर 10व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर जॉर्डन सिल्क खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर चांगल्या खेळीच्या दिशेने वाटचाल करणारा कर्णधार मोइसेस हेन्रिक्स 25 धावा करून बाद झाला. अशाप्रकारे सिडनीने 11.3 षटकात 70 धावसंख्यंवर 5 विकेट गमावल्या.
त्यानंतर सिडनीची सहावी विकेट 14व्या षटकात बेन द्वारशुईसच्या रूपाने पडली. तो शून्यावर माघारी परतला. त्यानंतर 15 व्या षटकात हेडन केरने 6 धावा करत आपली विकेट गमावली. यानंतर, 18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सीन अॅबॉट 16 धावांवर तर पुढच्याच चेंडूवर स्टीव्ह ओ’कीफ गोल्डन डकवर बाद झाला आणि यासह सिडनीचा डाव 112 धावांवर संपुष्टात आला.
ब्रिस्बेन हीटच्या गोलंदाजांची प्रभावी कामगिरी…
ब्रिस्बेन हीटकडून स्पेन्सर जॉन्सनने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय झेवियर बार्टलेट आणि मिचेल स्वेप्सन यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. तर मायकेल नसीर आणि पॉल वॉल्टर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.