भिगवण -येथे ट्रामा केअर सेंटरमध्येच कोविड केअर सेंटर सुरू करणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. भिगवण (ता. इंदापूर) येथील नियोजन व आढावा बैठकीत ते बोलत होते.
भरणे म्हणाले की, ट्रामा सेंटरमधील सुविधा पाच दिवसांमध्ये पूर्ण करून हे सेंटर सुरू केले जाणार आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार होणार आहे. यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रोहन कुंभार, संतोष धवडे, सचिन बोगावत, अजिंक्य माडगे, अनिकेत भरणे, संदीप वाकसे, विक्रम शेलार, अमोल देवकाते उपस्थित होते.
अखेर भरणेंकडून दखल
भिगवण परिसरात सातत्याने वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता भिगवण परिसरासाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटरची मागणी केली जात होती. ट्रामा केअर सेंटर वापराविना पडून होते. जिल्हा परिषद आणि लोकप्रतिनिधींनी या ट्रॉमा केअर सेंटरच्या स्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष केले होते. मात्र, भरणे यांनी दखल घेतल्यामुळे कोविड सेंटर सुरू होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.