Bhandara–Gondiya Lok Sabha Election 2024: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान, महत्वाचे मुद्दे – महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. 19 एप्रिल) रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. भाजपकडून सुनिल मेंढे यांना तर काॅंग्रेसने प्रशांत पडोळे यांना उमेदावारी दिली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ कसा आहे ? निवडणूकीशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया…
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक महत्वाचे मुद्दे –
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणारा मतदारसंघ म्हणून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची ओळख.
– भंडारा लोकसभा मतदारसंघ असं सुरुवातीला या मतदारसंघाचं नाव होतं.
– या मतदारसंघातून 1954 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पोटनिवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
– 2008 नंतर सीमांकनामध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला.
– हा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेसच्या ताब्यात होता. पण, प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आणि या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व कमी झालं.
– काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिला.
– प्रफुल्ल पटेल 2009 ला लोकसभेवर निवडून गेले होते.
– जवळपास 25 वर्षांनंतर काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर भंडारा गोंदियात उमेदवार निवडणूक लढवणार आहे.
– भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघ भंडाऱ्यातील, तर तीन गोंदिया जिल्ह्यातील येतात.
– तुमसर, भंडारा, साकोली हे भंडारा जिल्ह्यातले, तर अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया हे गोंदिया जिल्ह्यातील मतदारसंघ आहेत.
– प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील जातीचं राजकारण निर्णायक ठरतं.
– या मतदारसंघात कुणबी समाजाचं वर्चस्व आहे. त्यापाठोपाठ तेली आणि पोवार समाजाची मतं आहेत. तसेच अनुसूचित जातीचाही मतदारवर्ग आहे.
– गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर कुणबी उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेला दिसतो.
– या निवडणुकीतही भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी कुणबी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
– बहुजन समाजवादी पक्षानं तेली समाजाच्या संजय कुंभलकर यांना उमेदवारी दिली आहे.
– तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पोवार समाजाची मतं कुणाकडे जातात त्यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.
– या मतदारसंघातील लोकांसाठी प्रशांत पडोळे हे नवीन आहेत. त्यांचा या मतदारसंघात जनसंपर्क नाही.
– विदर्भातले सहकारमहर्षी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र याशिवाय प्रशांत यांची ओळख नाही.
– पडोळे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचं डिपॉजिट जप्त झालं होतं.
– प्रशांत पडोळे यांचे वडील यादवराव पडोळे हे नाना पटोलेंचे राजकीय गुरु मानले जातात. त्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट देऊन पटोलेंनी गुरुदक्षिणा दिली असल्याचे काहीजण बोलतात.
– सुनील मेंढे हे पाच वर्ष खासदार होते.
– या मतदारसंघात विकासकामे झाली नसल्याने मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे.
– मेंढे हे महायुतीचे उमेदवार असल्यानं त्यांच्यामागे प्रफुल्ल पटेल यांचीही ताकद आहे.
– मेंढे यांना निवडून आणण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेलांनी घेतली आहे.
– मोदींचा चेहरा आणि राम मंदिर हे दोन मुद्दे मेंढे मतदारांसमोर घेऊन जाताना दिसतात.
– सुनील मेंढे यांच्या तुलनेत पडोळे हे अतिशय नवीन उमेदवार आहेत.
– प्रफुल्ल पटेल हे गोंदियातील, तर नाना पटोले भंडाऱ्याचे आहेत.
– सुनील मेंढे यांच्यामागे प्रफुल्ल पटेल तर प्रशांत पडोळे यांच्यामागे नाना पटोले यांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
– भंडारा गोंदियात मतदारसंघात अनुसूचित जातीचा मतदार वर्ग आहे. पण, हा मतदार बसप आणि काँग्रेसकडे झुकलेला आहे.
– या मतदारसंघात भाजपचे नेते संजय कुंभलकर यांना बसपने तिकीट दिलं आहे. कुंभलकर तेली समाजाचे नेते आहेत.
या लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये भाजपचे सुनील मेंढे विजयी झाले होते. 2014 मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मधुकर कुकडे तर 2009 मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले होते.