लोणी काळभोर -कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे लसीकरण केंद्रावर महिला सरपंचांना शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
दरम्यान या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मारहाण करतानाचा व्हिडीओच शेअर केल्याने या प्रकरणी राजकारण तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.
कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी चित्तरंजन गायकवाड (वय 40, रा. पांडवदंड रोड, कदमवाकवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सुजित सुभाष काळभोर (वय 33, रा. कदमवाकवस्ती) याला अटक करण्यात आली होती.
त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी कदमवाकवस्तीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने कोविड – 19 लसीकरणाचे
आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच गौरी गायकवाड या एंजल हायस्कुल, संभाजीनगर येथे उपस्थित होत्या. तेथे सुजित काळभोर आणि अविनाश उर्फ पप्पु बडदे यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाली.
काळभोरने अविनाश यांच्या कानाखाली मारली. त्या वेळी सरपंच गौरी गायकवाड तेथे गेल्या असता त्यांनाही सुजित याने शिवीगाळ करत कानाखाली मारुन खाली जमीनीवर पाडले. त्यानंतर लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी त्याचे तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना न जुमानता त्याने सरपंचांच्या डाव्या हाताला धरुन जमीनीवर पाडले.
सुजित काळभोर याने दिलेल्या फिर्यादी नुसार सकाळी लसीकरणासाठी गेला असता पप्पू बडदे त्याला तु थांब म्हणाला. यांवरून वाद निर्माण झाला. त्यानंतर तेथे सरपंच गौरी गायकवाड आल्या त्यांनी कानशिलात लगावल्याने हाणामारी झाली. हे पाहून तेथे सचिन अरविंद काळभोर, महेश ज्ञानेश्वर काळभोर हे आले व सर्वांनी त्यास हाताने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे या तपास करत आहेत.