- लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळावर जमावबंदी लागू
लोणावळा : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार आवाहन करून देखील नागरिक गर्दी करत असल्याने शुक्रवारपासून (दि. 16) नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
लोणावळ्यातील भुशी धरण तुडुंब भरले आणि पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहू लागला असे म्हणताच हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. दरवर्षी याहून वेगळे चित्र नाही. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना पर्यटनस्थळी येण्यास मज्जाव आहे.
परंतु, नियम पायदळी तुडवत नागरिक लोणावळ्यातील पर्यटनस्थळी पोहचताच. करोनाची दुसरी लाट ओसरली, परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करून नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच केले होते. परंतु त्यांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून नागरिक गर्दी करत असल्याचे पाहायला मिळाले.
शनिवार आणि रविवार रोजी, तर हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. त्याच बरोबर धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियमांचे स्वागत करून नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले आहे.
…या ठिकाणी नियम लागू आहेत
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रीज, वलवण डॅम, एकवीरा मंदिर परिसर, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, भाजे धबधबा धबधबे, धरण या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू राहतील.