जयपूर – कॉंग्रेसशासित राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सल्लागार संयम लोढा यांनी गुजरातमधील कॉंग्रेसजनांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गुजरातमधील कॉंग्रेसचे 10 आमदार फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.
त्याचा संदर्भ देऊन लोढा यांनी एक ट्विट केले. निवडणुकीआधी कॉंग्रेसच्या 10 आमदारांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले. ट्विट करताना लोढा यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही टॅग केले. त्या ट्विटमुळे राजकीय सनसनाटी निर्माण झाल्यानंतर लोढा यांच्याशी पीटीआय वृत्तसंस्थेने संपर्क साधला.
गुजरातमध्ये फोडाफोडीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मला मिळाली आहे. ती माहिती मी कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी रघू शर्मा यांच्याकडे 20 दिवसांपूर्वीच पोहचवली. मात्र, त्यांनी कुठली कृती केलेली दिसत नाही. त्यामुळे मी सतर्क करणारे ट्विट करताना कॉंग्रेस नेतृत्वाला टॅग केले, असे ते पीटीआयशी बोलताना म्हणाले.
गुजरातमध्ये मागील विधानसभा निवडणुकीत (2017) कॉंग्रेसने जोरदार टक्कर दिल्याने विजय मिळवताना भाजपची दमछाक झाली. त्यानंतर आतापर्यंत डझनभर आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मागील निवडणुकीत 77 जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेसचे संख्याबळ घटून आता 65 इतके झाले आहे. मागील निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. सध्या त्या पक्षाचे 112 आमदार आहेत. गुजरात विधानसभेचे एकूण संख्याबळ 182 इतके आहे.