बारामती (प्रतिनिधी) – अंगावर डिझेल ओतून पेटवून देऊन पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस येथील अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, आरोपी उमेश रामचंद्र गायकवाड यास पत्नीची हत्या केली म्हणून जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली आहे. यवत (ता. दौंड) येथे १९मे २०१२ रोजी ही घटना घडली होती.
आरोपी उमेश गायकवाड याने त्याची पत्नी उषा हीचे अंगावर डिझेल ओतून पेटवून देवून तीची हत्या केली म्हणून यवत पोलीस स्टेशनमध्ये भा. द. वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाल होता. आरोपी उमेश यास दारूचे व्यसन होते. तसेच, तो गावठी दारू आणून त्याची विक्री देखील करत होता. मात्र, त्याला उषा विरोध करत असल्याने आरोपी उमेश पत्नी उषा हिला मारहाण करत.
१९ मे २०१२ रोजी उमेश ने विकायला आणलेली गावठी दारू विकली न गेल्याने, त्याने कॅन मधील दारू प्यायला सुरुवात केली. मयत उषाने त्यास विरोध केला व दारूचा ग्लास ओतून दिला. त्यावरून आरोपी उमेश याने मयत उपास मारहाण केली. त्यानंतर उमेश ने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिले.
उषाने पेट घेतल्यावर तिला विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याच्या देखील हाताला भाजले. पत्नी उषा ने आरडा ओरडा केल्यावर त्यांच्या मुलानी घटना पाहीली होती. त्यानंतर उषा हीस प्रथमोपचार झाल्यावर ससून रुग्णालय मध्ये दाखल केले. तेथे तिने मृत्यूपूर्व जबाब दिला. तिच्या जबाबाप्रमाणे गुन्हा दाखल झाला. तसेच त्यांचा मुलगा याचा देखील जबाब नोंदवला गेला होता.
न्यायालयात मुलाने आरोपी उमेशच्या विरोधात जबाब दिला. तसेच मयत उषा हिचा मृत्यूपूर्व जबाब न्यायालयात शाबीत झाला. आलेला पुरावा हा आरोपी उमेशच्या विरोधात होता. त्या अनुषंगाने सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून बारामतीच्या अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.