Asian and Oceaninan Rowing Olympic Qualification Regatta 2024 – भारताच्या बलराज पनवारने रोईंगमध्ये पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट मिळवून दिले आहे. त्याच्यासह पॅरा मिश्र दुहेरीत नारायण कोंगनापल्ले आणि अनिता या जोडीने पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकसाठीही आपले स्थान निश्चित केले आहे.
दक्षिण कोरियातील चुंगजू येथे झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत बलराजने पुरुष एकेरीच्या स्कल स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. यासह त्याने रोईंगमध्ये भारताला पहिला कोटा मिळवून दिला. त्याने 2000 मीटर शर्यतीत 7 मिनिटे 01.27 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
या स्कल स्पर्धेत अव्वल पाच खेळाडूंना ऑलिम्पिक कोटा मिळणार होता. अशा परिस्थितीत बलराज तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने त्याचे स्थान निश्चित झाले. तर उज्वल कुमार आणि अरविंद सिंग यांना पुरुषांच्या लाइटवेट दुहेरी स्कल्समध्ये कोटा गाठता आला नाही. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने या स्पर्धेत भाग घेतला होता. उज्ज्वल आणि अरविंद यांनी दुहेरी स्कल्समध्ये तिसरे स्थान पटकावले होते. यंदा मात्र त्यांची संधी हुकली आहे.
तर दुसरीकडे, नारायण कोंगनापल्ले आणि अनिता यांनी पॅरा मिश्र दुहेरी स्कल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून पॅरिस येथे होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिकसाठीचा कोटा निश्चित केला आहे. नारायण आणि अनिता जोडीने डबल स्कल पॅरा रोवर्समध्ये 7:50:80 अशी वेळ नोंदवली.
कझाकस्तानच्या याकोव्हलेव्हला सुवर्ण
रविवारी झालेल्या स्पर्धेत हरियाणाच्या कर्नाल येथील रहिवासी असलेल्या पनवारने संथ सुरुवातीनंतर वर्चस्व राखले आणि तिसरे स्थान पटकावले. कझाकस्तानच्या व्लादिस्लाव याकोव्हलेव्हने (6:59.46) सुवर्णपदक जिंकले आणि इंडोनेशियाच्या मेमोने दुसरे स्थान पटकावले.