निमसाखर -इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मशागतीच्या कामाला सुरुवात केल्याने शेतातील कामाला वेग आला आहे. बैलाकरवी होणारी नांगरणीस शेतकऱ्यांनी फाटा देत ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी करीत आहे.
इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, घोरपडवाडी, हगारेवाडीसह अन्य गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामाच्या पूर्व नांगरणी सुरू आहे. जून महिना सुरू होण्याअगोदर बळीराजा शेतातील कामे ट्रॅक्टर व बैलजोडीच्या साह्याने उरकून घेत आहे. सध्या सूर्य आग ओकत असून नांगरणीनंतर क्षेत्र तापण्यासाठी ठेवले जाते. शेत चांगले तापल्यानंतर पुढील हंगामातील पिके जोमदार येत असल्याचे शेतकरी सांगतात. नांगरणीसाठी एकरी 2400 रुपये दर असल्याचे ट्रॅक्टर व्यवसायिक रशीद मुलाणी यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यात खरीप हंगामातील 21 हजार हेक्टर क्षेत्रावरती पेरण्या होणार आहे. यात 7 हजार हेक्टर क्षेत्रात मका, 1 हजार 500 हेक्टर क्षेत्र बाजरी 8 हजार हेक्टर क्षेत्र आडसाली ऊस, चारा पिके 3 हजार हेक्टर क्षेत्र तर 1 हजार हेक्टर क्षेत्रात तूर व इतर पिके घेतली जाणार आहे.
– बाळासाहेब कोकणे, कृषी अधिकारी, इंदापूर तालुका