सोरतापवाडी (सचिन सुंबे) – सोरतापवाडी हद्दीत जुना बेबी कालवा तुडुंब भरल्याने फुटुन त्यातून विसर्ग झाल्यामुळे सोरतापवाडी येथील स्मशानभूमीत पाणी घुसले आहे. कालवा फुटल्याने शेकडाे लीटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून हवेली तालुक्यातील या प्रकल्पाची ओळख आहे. सध्या हवेली व दौंड तालुक्यातील शेतीचे सिंचन या कालव्याच्या साह्याने होते.
या कालव्याचे लोणी काळभोर पर्यंत अस्तरिकरण करण्यात आले. परंतु अजूनही अपूर्ण आहे. या कालव्याची दरवर्षी साफसफाई होत नाही. त्यामुळे कालव्यात पाणी थांबून राहते. याचा फटका इतर शेतकऱ्यांना होतो.
आज सोरतापवाडी येथे कालवा फुटुन पाणी बाहेर आले. पुणे महानगरपालीकेच्या वतीने शहरातील शुध्द केलेले सांडपाणी मुंढवा जॅकवेलच्या मदतीने बेबी कालव्यात सोडले जाते. या कालव्याचे सोरतापवाडी, उरुळी कांचन तसेच बोरी एैदी भागात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.
पण पाटबंधारे विभागाच्या निष्काळजी धोरणामुळे आज जलपर्णीमुळे बेबी कालव्याला भगदाड पडुन सोरतापवाडी हद्दीत लाखो लिटर पाणी वाया जाऊन लगतच्या शेतात पाणी शिरले व शेतक-याचे हाता-तोंडाशी आलेले पिक वाया जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.