पिंपरी, दि. ११
स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची महती देशभर पोचविण्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्ट यांच्या वतीने 125 जयंती निमित्त मी पण सुभाष या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड परिसरात तीन ठिकाणी उभे राहून जनजागृती करण्यात आली. या मोबाईल व्हॅन मधून देशभक्तीपर गीते लावून सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याची माहिती देणारे फलक देखील लावण्यात आले होते. याला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ जयंती निमित्त केंद्र सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती हा त्यापैकी एक उपक्रम आहे. देशभरात तीन मोबाईल व्हॅनची निर्मिती केली आहे. त्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा, तीन जवानांची हलती प्रतिकृती, बोस यांच्याविषयी माहिती सांगणारी मोठी एलईडी आदींचा समावेश होता. प्रत्येक व्हॅनसाठी ठरवून दिलेल्या राज्यात जाऊन प्रचार केला जात होता. एक व्हॅन मुंबईमधून जनजागृती करत पिंपरीत आली. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील महेशनगर, पिंपरी म्हाडा, केएसबी चौक आदी ठिकाणी चौकात उभे राहून जनजागृती केली जात होती. त्यासाठी सहा कर्मचारी नियुक्त केले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात वरून दिल्ली येथे या व्हॅनचा मार्ग असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.