मुंबई – बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंगला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियन इमिग्रेशनने त्याचा व्हिसा रद्द केला आहे. त्याचा व्हिसा अर्ज रद्द करण्यामागे त्याचा गुन्हेगारी इतिहास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील विविध शहरांमध्ये मिका सिंगचे लाइव्ह कॉन्सर्ट होणार होते, ते शो आयोजकांनी तत्काळ प्रभावाने रद्द केले. 11 ते 19 ऑगस्ट दरम्यान ऑस्ट्रेलियातील अनेक शहरांमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होणार होते, ज्याची तिकिटेही विकली गेली आणि सर्व तयारी पूर्ण झाली. सर्व तिकीट खरेदीदारांना पैसे परत करावे लागतील, ज्यामुळे आयोजकांचे मोठे नुकसान होईल.
ऑस्ट्रेलियातील सर्व शो आयोजकांनी मिळून सिंगरला राजकीय दबाव आणून व्हिसा मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण खूप प्रयत्न करूनही अधिकारी आणि मंत्र्यांनी कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन कोणतीही मदत करण्यास नकार दिला. शो रद्द करण्याचे कारण दोन दिवसांपूर्वी मिका सिंगने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले होते की, ‘मी ऑस्ट्रेलियाला येत आहे.
मी तुमच्या सुंदर शहराला रॉक करायला येतोय त्यामुळे माझ्यासोबत डान्स करायला तयार रहा पण आता सर्व शो अचानक रद्द झाल्याने चाहत्यांना निराशेला सामोरे जावे लागले आहे. त्याचवेळी, शो रद्द करण्यामागचे कारण आधी मिका सिंगची तब्येत असल्याचे सांगितले जात होते, परंतु खरे कारण काहीतरी वेगळेच असल्याचे समोर आले. ऑस्ट्रेलियात राहणार्या पंजाबी समुदायात खूप उत्साह होता पण व्हिसा रद्द झाल्यामुळे प्रचंड निराशा झाली आहे.